Saturday, October 5, 2013

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा इतिहास



पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचा इतिहास …

सन १८९३ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले.
दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा.

भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक
संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली . ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य
टिळकांच्या हस्ते झाली होती.

सन १८९६ :- सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती म्हणून प्रचलित होता.

सन १९६८ :- सन १८९६ साली केलेल्या मुर्तीची थोडी जीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली गणपती बाप्पाच्या अमृत महोत्सव साजरा झाला. ब-याच कार्यकर्त्यांनी नविन गणपतीची मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मुर्ती नमुना म्हणून करून घेतली व श्री. बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टर वरून मोठया पडद्यावर कार्यकर्त्यांना दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मुर्तीसारखी असल्याची खात्री पटल्या वर प्रत्यक्ष मोठया मुर्तींचे काम सुरू झाले. संपूर्ण मुर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. श्री. गणेश यंत्राची पुजा केली व त्यानंतर ज्याठिकाणी मातीची मुर्ती तयार केली, त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला व ते सिध्द श्रीयंत्र मंगलमुर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. या मंगलमुर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पुजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले.

आजतागायत हे सर्व अत्यंत निठेने व प्रामाणिकपणे सुरू आहे व त्यामुळे आपणा सर्वांना त्या गणपती बाप्पाचे आर्शिवाद लाभले आहेत. अशा प्रकारे सध्या गणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर, नवसाला पावणारी व त्याकाळी सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रूपये) ही मुर्ती बनविण्याचा खर्च आला होता.

! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती !

गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया

असचं एका पुणेकराकडून साभार

No comments: